साने गुरुजी वाङ्मय
आत्मकथनपर कादंबरी
श्यामची आई (१९३५) : हे गुरुजींचे सर्वात गाजलेले पुस्तक. हे पुस्तक मातेचा महिमा गाणारे आहे. आईच्या थोर शिकवणीचे, सरळ, साध्या, सुंदर जीवनाचे करुण परंतु प्रेरक कथात्मक चित्र गुरूजींनी या कादंबरीत रेखाटले आहे.
श्याम (१९३८): या कादंबरीत गुरुजींच्या दापोलीच्या शालेय आणि कौटुंबिक जीवनाचे स्मृतिरूप कथन गुरुजींनी केले आहे.
धडपडणारा श्याम (१९३८) : औंधच्या शाळेतील व नंतर पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थी जीवनाचे आत्मकथन गुरुजींनी या कादंबरीत केले आहे.
श्यामचा जीवनविकास (१९४०) : कॉलेजमधील शिक्षण काळातील काही व्यक्तिगत व कौटुबिक आठवणी, सत्याग्रह, बालवीर चळवळ, स्वयंसेवक कार्य इत्यादी विषयीचे कथन गुरुजींनी या कादंबरीत केले आहे.
कादंबरी
थडपडणारी मुले, खंड १ व २ : (१९३७) : या कादंबरीमध्ये गोपाळराव, स्वामी, नामवेव, रघुनाथ इत्यादी भारतपुत्र मातृभूमीच्या उद्धारासाठी कशी धडपडत आहेत हे गुरुजींनी लिहिले आहे.
पुनर्जन्म (१९३९) : यात तुरुंगातील राजकीय व इतर कैद्यांनी सांगितलेल्या विविध अनुभवांवरून रचलेली, ‘स्त्रियांची एकनिष्ठता व पवित्र प्रेम’ यावर गुरुजींनी कथा लिहिली आहे.
सती (१९४०) : ही सामाजिक कादंबरी आहे. यात स्त्री जीवनातील ‘करूणा आणि व्यथा’ गुरुजींनी व्यक्त केली आहे. अजोड विवाहाचे दुःख गुरुजींनी व्यक्त केले आहे.
आस्तिक (१९४०) : तत्कालिन हिंदू-मुसलमान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आधारित आहे. ‘आर्य’ व ‘नाग’ ही रूपके यामध्ये प्रभावीपणे वापरली आहेत.
क्रांती (१९४०) : शेतकरी-कामकरी आणि विद्यार्थी यांचे प्रश्न घेऊन 'बंगाल-महाराष्ट्र' यांचे मिलन गुरुजींनी या कादंबरीत दाखवले आहे.
चित्रकार रंगा (१९४२) : प्रांतीयंता, जातीयता, धर्मांधता अशा गोष्टींवर मात करून काही हजार वर्षांची आदर्शवादी भारतीय परंपरा तो नायक आपल्या कलोपासनेचा विषय बनवितो. हाच या गुरुजींच्या कथानकाचा गाभा आहे.
रामाचा शेला (१९४४) : गुरुजींची ही एक सामाजिक कादंबरी आहे. ही ‘सरला’ या दुर्दैवी मुलीची कथा आहे. गुरुजींनी स्त्री जन्माची करूण कहाणी यामध्ये दर्शवली आहे.
कालिमातेची मुले (१९४२) : ‘मानव्या’चा आधार असला तर एकमेकांबद्ल आदर वाटून सहिष्णुतेने व प्रेमाने वागता येते हेच या कादंबरीचे कथानक आहे. ही एक रुपांतरित कादंबरी आहे
तीन मुले (१९४४) : ही एक रूपांतरित कादंबरी आहे. 'मंगा', 'बुघा' आणि 'माधुरी' यांच्या प्रेममय जीवनाची आणि त्यांच्यावर माया करणाऱ्या एका वृद्धेची अद्भुत जीवन कहाणी आहे.
संध्या (१९४६) : देशप्रेमाने भारलेल्या 'संध्या', 'कल्याण', 'हरिणी', 'माईजी' अशा व्यक्तींची ही जीवनकथा आहे.
गोड शेवट (१९४६) : कलेमुळे एकेठिकाणी आलेल्या श्रीमंत - गरीब ध्येयवादी देशभक्तांची कहाणी आहे.
दिगंबर राय : इंग्रजी अंमलातील परिस्थितीचे उत्कट चित्रण या लघुकादंबरीत केलेले आहे.
दीनबंधू : 'दीनबंधू' ही गुरुजींनी लिहिलेली प्रचारप्रधान कादंबरी आहे.
नवा प्रयोग : 'नव-भारता'च्या घडणीचा एक आराखडाच ह्या कांबदरीमध्ये गुरुजींनी वर्णिला आहे.
कथा-साहित्य
'विश्राम', 'सोनसाखळी', 'मुलांसाठी फुले', 'अमोल गोष्टी', 'दारूबंदीच्या कथा', 'साक्षरतेच्या कथा', 'सुंदर कथा', 'श्रमणारी लक्ष्मी', 'त्रिवेणी' (शबरी), 'कावळे', 'जनी', 'मोरी गाय', 'जयंता', 'शुक्री', 'कलिंगडाच्या साली' इत्यादी कथा साहित्याची निर्मिती गुरुजींनी केली. तसेच गुरुजींचे खालील काही कथा साहित्य खूप गाजले:
आपण सारे भाऊ : स्वातंत्र्य लढ्यात सहभागी युवापिढीची मनस्थिती आणि गृहस्थिती सांगणारी ही कथा आहे.
गोप्या : एक पोरका, परावलंबी मुलगा, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन स्वकर्तृत्वावर शेतकऱ्यांची संघटना उभारून सत्याग्रह करतो, याचे दर्शन या कथेत घडविले आहे.
मिरी : एका गरीब मुलीची आणि तिला मायेने, ममतेने वागविणाऱ्या कंदीलवाल्याची आहे. प्रमाचे नाते या गोष्टीतून कळते.
दुर्दैवी : दारूच्या व्यसनापायी रंगारावांनी आपल्या सुखी जीवनाचा कसा विचका केला ते यात गुरुजींनी सांगितले आहे.
नवजीवन : आपल्या प्रतिष्ठितांचे 'श्रीमंत' जीवन कसे आहे आणि ते का बदलले पाहिजे, हे या कथेत गुरुजींनी रेखाटले आहे.
स्वर्गीय ठेवा : अनाथ, म्हातारे आनंदराव आणि शालीन अशी शांती यांची ही कथा आहे. नवी नाती कशी जोडावीत याचे दर्शन येथे घडते.
खरा मित्र : राजपुत्र व प्रधानपुत्र यांच्या माध्यमातून खरा मित्र कसा असावा हे गुरुजींनी मुलांच्या मनावर बिंबविले आहे.
घामाची फुले : ही कथा रामायणातील एका प्रसंगावर आधारित आहे. यामध्ये मातंग ऋषी व मुले यांच्या संवादातून श्रमाचे महत्व सांगितले आहे.
मनूबाबा : यामध्ये ध्येयार्थी जीवन कसे रसमय, प्रेममय, त्यागमय होते याचा आदर्श नमुना "मनुबाबा" च्या रूपाने गुरुजींनी मांडला आहे.
फुलांचा प्रयोग : कितीही अडचणी आल्या तरी माणसाने आपल्या कर्तव्यापासून विचलित होऊ नये हे या कथेमध्ये सांगितले आहे.
दुःखी : 'वालजी’ या चोराच्या माध्यमातून गुरूजींनी परस्परांवर प्रेम करा. एकमकावर संशय घेऊ नका हा संदेश अप्रत्यक्षरित्या या कथेतून दिला आहे.
सोराब नी रूस्तुम : क्षुल्लक चुकीची केवढी मोठी किंमत मोजावी लागते हे पिता-पुत्र यांच्या संवादाच्या माध्यमातून सांगितले आहे.
बेबी सरोजा : ‘हरिजनांचा उद्धार आणि देशसेवा’ हा या कथेचा मूळ गाभा आहे.
करूणादेवी : या कथेतून कर्तव्याचे पालन कसे करावे हे गुरुजींनी सांगितले आहे.
यति की पती : ज्यांच्या वृत्ती कोवळ्या, प्रेमळ, भावनोत्कट आहेत अशांनी ‘पती’ होऊनच व संसारात राहून 'यती' होण्याची खटपट करावी असे गुरुजींनी या कथेत व्यक्त केले आहे.
चित्रा नि चारू : हिंदू-मुसलमान यांचे ऐक्य गुरुजींनी यामधून दर्शविले आहे
काव्य
पत्री (१९३५) : १६१ कवितांमधून देशभक्ती, देवभक्ती, दुःख, निराशा या विषयावर काव्यरचना केल्या आहेत.
नाट्य वाङ्मय
ते आपले घर (१९३९) : देशापुढील जे स्पृश्य-अस्पृश्य, हिंदू-मुसलमान ऐक्य, सत्याग्रह, श्रमजीवीसंबंधी आपले कर्तव्य हे तत्कालीन प्रश्न 'राजा', 'गोपाळ', 'गणपतराव' इत्यादी पात्रांच्या माध्यमातून मांडले आहेत.
निळा पक्षी (१९३९) : मनुष्याने स्वतःच्या सुखाकरीता जे काही बरे वाईट केलेले आहे त्यांना सुख कधीच लाभत नाही. कठोर, करूणरम्य सत्य या नाटकादारे त्यांनी मांडले आहे.
याचबरोबर ‘रामाचा शेला’, ‘ही खरी संस्कृती’, ‘सावित्री’ इत्यादी नाटके गुरुजींनी लिहिली.
वैचारिक वाङ्मय
भारतीय संस्कृती (१९३७) : आपल्या थोर संस्कृतीचे दर्शन लोकांना घऊन त्यातून जे काही सुंदर, शिव व सत्य ते ते पुढे घेऊन पुढे वाढणारी ही संस्कृती आहे. हेच गुरुजींना यामधून स्पष्ट करावयाचे आहे.
सोन्या मारूती (१९३७) : १९३५-१९३७ या काळात पुण्यातील सोन्या मारूतीचे मंदिर व मशीद यातून हिंदू-मुसलमान संधर्ष झाला. याच पार्श्वभूमीवर ही कथा आकाराला आली आहे.
गोड निबंध, भाग १ ते ३ (१९४४) : गुरूजींनी संपादिलेल्या ‘कॉंगेस’ या वर्तमानपत्रातून व ‘विद्यार्थी’ मासिकातून लेख लिहिले. ते लेख यामध्ये समाविष्ट केले आहेत. यामधील बरेच लेख हिंदुवासीयांच्या अंतः.करणात राष्ट्रीयत्वाची भावना प्रदीप्त करण्याच्या हेतूने लिहिले आहेत.
माझी दैवते (१९५५) : ज्या मानवतावादी दैवतांनी साने गुरूजींचे जीवन समृध्द केले त्या दैवतांविषयी कृतज्ञता गुरुजींनी या पुस्तकातून व्यक्त केली आहे.
कुमारांपुढील कार्य (१९६६) : मराठी साहित्य सर्वंकष करून महाराष्ट्राचा व भारताचा भविष्यकाळ उज्वल करा हे यातून गुरुजींनी सांगितले आहे.
गीतहृदय : भगवद्गीतेतील प्रवचनातून वाचकांना उपदेश केला आहे.
जीवनाचे शिल्पकार : या पुस्तकामध्ये अमेरिकन अध्यक्ष अब्राहम लिंकन, जर्मंन महाकवी गटे, चीनचे जनक सन्यत्सेन यांच्या जीवनाचा परिचय करून दिला आहे.
त्याचपमाणे ‘कर्तव्याची हाक’, ‘स्वातंत्र्याचा अर्थ’, ‘समाजवाद हा एकच मार्ग’, ‘भारतीय नारी’, ‘मदिर प्रवेश’ ही गुरूजींची निबंधाकात्मक शैलीतील वैचारिक साहित्यसंपदा प्रसिद्ध झाली आहे.
पत्र - वाङ्मय
श्यामची पत्रे (१९३९-१९४०) : आपला पुतण्या वसंता याला उद्देशून लिहिलेल्या अनेक पत्रांपैकी निवडक पत्रांचा संग्रह ‘श्यामची पत्रे’ म्हणून १९६४ साली पुस्तक रूपात आली. ही पत्रे स्वातंत्र्यात युवकांच्या सहभागासंबंधी आहेत.
सुंदर पत्रे : १९४९-१९५० मध्ये ‘साधना’ साप्ताहिकात आपली पुतणी सुधा हिला उहेशून ‘सुधेस पत्रे’ या शीर्षकाने पत्रे लिहिली. त्याचे तीन खंड पुढे 'सुंदर पत्रे’ म्हणून प्रसिध्द झाले. त्यातून गुरुजींचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य आणि निसर्गसौंदर्य स्पष्ट झाले आहे.
चरित्र वाङ्मय
‘नामदार गोखले’ चरित्र (१९२५), ‘ईंशवरचंद्र विद्यासागर’ (१९२७), ‘इतिहासाचार्य राजवाडे’ (१९२८), ‘शिशिकुमार घोष’ (१९२९), ‘बेंजामिन फ्रँकलिन’ (१९२९), ‘कविवर्य रवींद्रनाथ टागोर’ (१९३०), ‘जीवनप्रकाशन’ (१९३७), ‘श्री. शिवराय’ (१९४४), ‘विनोबा भावे’ (१९४४), ‘देशबंधू दास’ (१९४४), ‘महात्मा गांधी दर्शन’ (१९४८). ‘महात्मा गौतम बुद्ध’, ‘बापूजींच्या गोड गोष्टी’, ‘आपले नेहरू’, ‘लोकमान्य टिळक’, ‘भगवान श्रीकृष्ण’, ‘इस्लामी संस्कृती’ (मुहंमद पैगंबर चरित्र), ‘महात्मा गांधी दर्शन’ इत्यादी चरित्रे गुरुजींनी लिहिली. यामध्ये गुरूजींनी या व्यक्तींचा पूर्ण परिचय, कार्य, कर्तृत्व, ‘विचार आणि आचार’, त्यांनी केलेला त्याग, कष्ट आणि त्यांची जीवनदृष्टी यांविषयी गुरुजींनी लिहिले आहे.
संपादित
स्त्रीजीवन, भाग १ व २ (१९४०) : यामधून गुरुजींनी कहाण्या, उखाणे, ओव्या, गाणी इत्यादींचे संकलन यामध्ये केले आहे.
अनुवादित साहित्य
‘खेड्यात जावून काय कराल?’, ‘राष्ट्धर्म’, ‘स्वदेशी समाज’, ‘मला म्हणजे काय?’, ‘समाजधर्म’, ‘कला आणि इतर निबंध’, ‘कल्की अथवा संस्कृतीचे भवितव्य’, ‘राष्ट्रीय हिंदुधर्म’, ‘कुरल’, ‘ऑमेलची चिंतनिका’, ‘मानवजातीची कथा’, ‘दिल्ली डायरी’, ‘साधना’, ‘ना खंत ना खेद’ इत्यादी अनुवादित साहित्याची निर्मिती गुरुजींनी केली.
संपादित साहित्य
तसेच, ‘कमलफुले’ (गोष्टी), ‘मेंग चियांग आणि इतर कथा’, ‘गुरूजींच्या गोष्टी’, ‘स्वप्न आणि सत्य’ (वैचारिक लेख), ‘हिमालयाची शिखरे’ (चरित्रात्मक निबंध), ‘चंद्रभागेच्या वाळवंटी’ (संत चरित्रे), ‘गुरुजींचे उपदेश’ इत्यादी आणि याशिवाय त्यांचे अनेक अप्रकाशीत साहित्यही आहे.
संदर्भ: शिवाजी विद्यापीठ प्रबंध