कार्यकारी मंडळ 

दिनकर गांगल

दिनकर गांगल हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संस्थापक संचालक आणि ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार, उषा मेहता, विजया चौहान यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती महाराष्‍ट्रात वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत त्‍यांनी ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके संपादित केली. ‘ग्रंथाली’ने वाचनवृत्ती म्हणजे ज्ञानजिज्ञासा हे ठामपणे मांडले आणि महाराष्ट्र समाज जाणकार, ज्ञानी व्हावा-असावा असा आग्रह धरला. गांगल यांनी ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ हे ‘ग्रंथाली’चे पुढील पाऊल/प्रगत रूप आहे असेच म्हटले आहे. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे गांगल यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन), ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ आणि ‘क्षितिज अपार’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना मुख्यत: महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे, वाङ्मयक्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’, जागतिक मराठी परिषदेचा ‘जीवनगौरव’ असे पुरस्‍कार लाभले आहेत.

गिरीश घाटे

गिरीश घाटे हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक आहेत. ते ठाण्याचे रहिवासी आहेत. ते धातुशास्त्रातील पदवीधर असून त्यांच्या ‘डॅकोट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ व ‘आयजेन सप्लाय चेन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्या आहेत. घाटे यांना इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज (नवी दिल्ली) या संस्थेने उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित (2015) केले आहे. घाटे हे सोलापूर जिल्ह्यातील यावली गावी ‘प्रभाकर फाउंडेशन’च्या वतीने माध्यमिक शाळा चालवत आहेत. महाराष्ट्र राज्य कृती समितेने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित केले आहे. घाटे रोटरी संस्थेचे सक्रिय सभासद आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनावर रोटरी तत्त्वांचा मोठा प्रभाव आहे. घाटे यांची ‘सांग ना समजेल का?’ (कविता संग्रह) आणि ‘रावसाहेब’ ही (चरित्रात्मक कादंबरी) पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

प्रवीण शिंदे

प्रवीण शिंदे हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. शिंदे मुंबई येथील ‘शिंदे, नायक अँड असोसिएट्स’ या सीए फर्मचे भागीदार आहेत. ते त्या फर्मच्या माध्यमातून ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेचे लेखापरीक्षक म्हणून गेली तीस वर्षे काम पाहत आहेत. ते कायद्याचेही पदवीधर आहेत. त्यांचा व्यवसायानिमित्त विविध सामाजिक संघटनांचा अभ्यास आहे. ते काही संस्थांशी व उपक्रमांशी सद्वृत्तीने जोडले गेले आहेत. शिंदे मूळचे नाशिकचे. ते रसिक आहेत. त्यांचे वाचन वैविध्यपूर्ण आहे. ते पर्यटनाच्या आवडीतून भारतासह सिंगापूर, दुबई, अमेरिका, युरोप, सायप्रस, मोझांबिक, दक्षिण आफ्रिका असे अनेक देश फिरले आहेत.

राजीव श्रीखंडे हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संचालक. ते ‘श्रीखंडे कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते अॅप्रेंटीस म्हणून 1986साली त्या कंपनीत रुजू झाले. त्यांनी कंपनीच्या अनेक यशस्वी प्रकल्पांसाठी मुख्य सल्लागार, कार्यकारी संचालक आणि संयुक्त प्रकल्प प्रमुख म्हणून जबाबदारी निभावलेली आहे. त्यांनी कंपनीचे नेतृत्व प्रकल्प आणि करार व्यवस्थापन, तांत्रिक लेखापरीक्षण आणि वाहतूक, सिंचन इत्यादीसारख्या विविध सेवा प्रदान करण्यात केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने अनेक मोठे पायाभूत प्रकल्प राबवण्यासाठी जगप्रसिद्ध बहुराष्ट्रीय सल्लागार कंपन्यांशी संघटन प्रस्थापित केले आहे. त्यांना जगभरातील पुस्तके वाचण्याचा ध्यास आहे. त्यांच्या घरी जगातील विविध तऱ्हांची नऊ हजारांहून अधिक पुस्तके, मुख्यत: इंग्रजीतील आहेत. ते सध्या ‘ग्लोबल साहित्यसफर’ हा ऑनलाईन कार्यक्रम ‘ग्रंथाली’साठी सादर करतात.

नितेश शिंदे

नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे उपसंपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुंडट ऑफ द इयर’ (२०१८) हा पुरस्कारही मिळाला आहे.