साने गुरुजी : संक्षिप्त परिचय 



असेजे आपणाशी असे, 

जे वित्त वा विद्या 

सदा ते देतची जावे, 

जगाला प्रेम अर्पावे 


साने गुरुजी 

साहित्यिक साने गुरुजी 

गुरुजींना लेखनाची तोंडओळख त्यांच्या कॉलेज जीवनातच झाली. लोकहितवादी चरित्र लेखनाच्या निबंध स्पर्धेत गुरुजींनी भाग घेतला आणि त्यात बक्षीसही पटकावले. त्यानंतर अमळनेर येथे शिक्षक म्हणून काम करीत असताना गुरुजींनी ना. गोखले यांचे चरित्र लिहून काढले. आपले लेखन गुरुजींनी मोठ्या आशेने शाळेचे मुख्याध्यापक गोखले यांना दाखवले. परंतु गोखले यांनी लेखन ‘अतिसामान्य’ असल्याचे मत व्यक्त केले. गुरुजींनी याचा राग न मानता आपल्या लेखनात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. 

अमळनेरच्या शाळेत शिकवत असताना गुरुजींनी ‘छात्र दैनिक’ या हस्तलिखित दैनिकाची सुरुवात केली. त्याचेच रूपांतर पुढे ‘विद्यार्थी’ नावाच्या छापील मासिकात झाले. जगातील  उत्तमोत्तम विचारांचा त्यात परिचय असे. देश विदेशातील घटनांच्या नोंदी होत. थोरांची चरित्रे आणि आठवणी दिल्या जात. गुरुजी या मासिकात सातत्याने लिहीत असत. त्यांनी लिहिलेली अनेक पत्रे या मासिकातून प्रसिद्ध झाली आहेत.

पुढे राजनीतीत पडल्यावर गुरुजींना अनेक वेळा कारावास झाला. कारावासात गुरुजींनी अनेक कविता, निबंध, कथा, इत्यादी लिहिले. त्यातील बरेच लेखन पुढे जाऊन मराठी साहित्यात अजरामर झाले. 

१७ मे १९३० रोजी गुरुजींना पहिला कारावास झाला. त्यांना धुळे येथील तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना तामिळनाडू मध्ये त्रिचनापल्ली येथे हलवण्यात आले. त्रिचनापल्ली येथून त्यांची सुटका २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली. ‘स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई । सुखवू प्रियतम भारतमायी ॥’ हे गीत त्यांनी येथेच लिहिले. त्याचबरोबर ‘खरा सत्याग्रही’ हे नाटक आणि ‘अस्पृश्यता’, ‘खरी ग्राम सुधारणा’, ‘बेबी सरोजा’, ‘दुःखी’ इत्यादी निबंध व लेख आणि ‘कुरल’ या ग्रंथाचा अनुवाद इत्यादि त्यांनी याच काळात लिहिले.

१७ जानेवारी १९३२ रोजी गुरुजींना पुन्हा दोन वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. त्यांची रवानगी धुळे तुरुंगात झाली. संयोगाने विनोबाजी देखील त्याच तुरुंगात कारावास भोगत होते. तुरुंगातील सहकाऱ्यांनी विनोबाजींना गीता ज्ञानाचा लाभ मिळावा अशी विनंती केली आणि विनोबांनी ती मान्य केली. दर रविवारी एक याप्रमाणे ही प्रवचने देण्याचे ठरले. गीतेची १८ प्रवचने १९ जून १९३२ पर्यंत पूर्ण झाली. यावेळी गुरुजी मनोभावे ही प्रवचने ऐकत. पण त्यांनी केवळ श्रवणभक्तीच केली नाही तर ती सर्व प्रवचने त्यांनी शब्दशः टिपून घेतली. ऐकलेली प्रवचने गुरुजी रात्री बसून परत लिहून काढत असत. हीच प्रवचने पुढे जाऊन विनोबांची ‘गीता प्रवचने’ या नावाने प्रसिद्ध झाली. 

ऑगस्ट १९३२ मध्ये गुरुजींना धुळे तुरुंगातून नाशिकच्या तुरुंगात हलवण्यात आले. १९३३ मध्ये फेब्रुवारी महिन्यात नाशिकच्या तुरुंगात गुरुजींनी ‘श्यामची आई’ ही त्यांची आत्मकथा लिहिली. गुरुजींच्या लिखाणात सर्वात गाजलेले हे लिखाण. पुढे जाऊन या पुस्तकाच्या तीन लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला ‘श्यामची आई’ या नावाचा चित्रपट देखील पडल्यावर झळकला. प्र. के. अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. 

‘श्यामची आई’, ‘श्याम’, ‘धडपडणारा श्याम’ आणि ‘श्यामचा जीवन विकास’ अशा चार आत्मकथनात्मक कादंबऱ्या गुरुजींनी लिहिल्या. साधारणतः गुरुजींचा वयवर्षे ६ ते १२ हा कालखंड ‘श्यामची आई’ या कादंबरीत आला आहे. त्यानंतरची ३ वर्षे म्हणजे वयवर्षे १६ पर्यंतचा कालखंड ‘श्याम’ या कादंबरीत आला आहे. आणि त्यापुढील साधारणतः ३ वर्षांचा काळ म्हणजे वयाच्या २२ व्या वर्षापर्यंतचा कालखंड ‘श्यमचा जीवन विकास’ या कादंबरीमध्ये आला आहे. 

गुरुजींनी ‘श्यामची आई’ या कादंबरीमध्ये प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की या कादंबरीवरून कोणी माझे आत्मचरित्र बनवू नये. मात्र त्याच प्रस्तावनेत ते असेही म्हणतात की या पुस्तकातील काही प्रसंग अथवा उद्गार अपवाद केले तर काल्पनिक असे काहीही नाही. त्यामुळे साने गुरुजींच्या आयुष्याचा पूर्वार्ध समजून घेण्यास ही पुस्तके मुख्य स्रोत म्हणून उपलब्ध आहेत. 

याच काळात गुरुजींनी त्यांचे ‘धडपडणारी मुले’ हे प्रसिद्ध पुस्तक पूर्ण केले. नाशिकच्या कारावासातच त्यांनी पुनर्जन्म, क्रांती आणि आस्तिक या कादंबऱ्या तसेच ‘निळा पक्षी’ हे नाटक आणि विश्राम, मोलकरीण, शशी या कथा इत्यादि पुष्कळ विविध प्रकारचे साहित्य लिहिले. ‘पत्री’ काव्यसंग्रहातील पुष्कळशा कविता देखील गुरुजींनी याच काळात लिहिल्या. ‘अश्रू’ ही प्रसिद्ध कविता त्यांनी नाशिकच्या तुरुंगातच लिहिली. 

‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या खालोखाल गुरुजींचे अत्यंत लोकप्रिय असे पुस्तक म्हणजे ‘भारतीय संस्कृती’ हे होय. भारतीय संस्कृतीचे समर्पक दर्शन गुरुजींनी या ग्रंथात केले आहे.  याचबरोबर ‘पत्री’ हा त्यांचा काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध झाला आहे. या त्यांच्या काव्यसंग्रहातून गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. श्यामची पत्रे आणि सोन्यामारुती या त्यांच्या पुस्तकांमध्ये गुरुजींनी आपली समाजवादी तत्वे मांडली आहेत. 

गुरुजींनी मुलांसाठी उदंड लिहिले. तसेच तरुण आणि प्रौढांसाठी कादंबऱ्या, कविता, चरित्र आणि अनुवाद ग्रंथ असे अनेक साहित्यप्रकार निर्माण केले. गुरुजींची १२० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

प्रा. के. क्षीरसागर आणि ना. सी. फडके यांनी गुरुजींच्या साहित्यावर बरीच टीका केलेली आढळते. क्षीरसागर म्हणतात, “साने गुरुजींची भाषा मुद्दाम उबवलेली, गबाळी आणि कित्येक ठिकाणी अशुद्ध आहे. त्यांच्या पुस्तकात दुबळेपणा, पाल्हाळ आणि रडवेपणा भरलेला आहे. ना. सी. फडके यांच्या मते ‘उपकार’ आणि ‘भूतदया’ या पलीकडे गुरुजींच्या लिखाणात फारसा बोधही नाही आणि भाषाशैलीचे सौंदर्य देखील नाही.  याउलट प्राचार्य प्र के अत्रे आणि विनोबाजी यांच्यासारख्या दिग्गजांनी गुरुजींच्या लेखनाचे तोंड भरून कौतुक केले आहे. 

साहित्यिक क्षेत्रामध्ये या उलट सुलट चर्चा होत होत्या. परंतु सामान्य जनतेला गुरुजींचे लेखन अतिशय आवडत होते. गुरुजींच्या पुस्तकांच्या विक्रीवरून हे सिद्ध होते.