कुणा न व्यर्थ शिणवावे,  कुणा न व्यर्थ हिणवावे | समस्त बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे ||

- साने  गुरुजी 

“मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी व समृद्ध व्हावा, ज्ञान-विज्ञान संपन्न व कलामय व्हावा, प्रेममय व्हावा हीच एक मला तळमळ आहे. माझे लिहिणे व बोलणे, माझे विचार व माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात”


साने गुरुजी

साने गुरुजी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक सत्यनिष्ठ, सेवाभावी, प्रेमळ, श्रद्धाळू असे व्यक्तित्व. गुरुजी म्हणजे एक भावनिक साहित्यकार, संपूर्ण आयुष्य देशसेवेस समर्पित करणारे त्यागमूर्ती आणि समाजवादी विचारांचे एक बहुआयामी व्यक्तित्व. आजच्या बदलत्या युगात भारतीय संस्कृतीची  मूल्ये समाजात जपणे अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या ग्लोबल वातावरणात माणूस वेगाने प्रगती करत आहे. परंतु त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मानवी मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुजींनी मांडलेली नीतिमूल्ये पुन्हा नवीन पिढीपुढे येणे आवश्यक आहे.  

अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात गुरुजींनी विपुल साहित्याची निर्मिती करून मराठी साहित्यात फार मोठे योगदान दिले. गुरुजींचे साहित्य प्रेम, जिव्हाळा, चांगुलपणा यांनी काठोकाठ भरलेले आहे. कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, पत्रव्यवहार, कविता संग्रह अशा विविध साहित्यप्रकारातून गुरुजींनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. ब्रिटिश राज्यात गुरुजींनी स्वतःला देशसेवेच्या कार्याला वाहून घेतले होते. यातून गुरुजींना अनेक वर्षे कारावास भोगावा लागला. साहित्याची निर्मिती गुरुजींनी याच काळात केली. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती तसेच अनेक कविता यासारखे प्रसिद्धी पावलेले साहित्य त्यांनी कारावासातच लिहिले. गुरुजींनी लिखाण अतिशय साध्या व सरळ शब्दात केले आहे. परंतु सामान्य वाचकाला ते अतिशय रम्य वाटते. काही समीक्षकांनी गुरुजींचे लिखाण अतिशय बाळबोध असल्याची टीका केली आहे. परंतु स्वतः गुरुजी सांगत की त्यांचे साहित्य म्हणजे ‘साहित्यसेवा’ नसून लोकसेवा आहे. भाषाशैली पेक्षा लिखाणातील ‘आशया’ला ते जास्त महत्व देत. 

साने गुरुजी त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यासाठी ओळखले जात असले तरी ते देशकार्याला अग्रक्रम देत असत. गुरुजींसारख्या भावनाप्रधान व्यक्तीवर  तत्कालीन राजकीय परिस्थितीचा परिणाम झाला नसता तरच नवल होते. घरची गरिबी असून देखील वयाच्या तिसाव्या वर्षी हातातली शिक्षकाची नोकरी सोडून गुरुजींनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले. खानदेश आणि महाराष्ट्राच्या इतर भागात दौरे करून त्यांनी जनजागृतीच्या कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील शेतकरी आणि गिरणी कामगार यांच्या हक्कासाठी त्यांनी प्रभावी आंदोलन उभे केले. यातून त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. यातून नाउमेद न होता त्यांनी समाज जागृतीचे आपले ध्येय अधिक जोमाने चालू ठेवले. समाजातील असमानता, जातीभेद, अस्पृश्यता यांचा गुरुजींना मनस्वी तिटकारा होता. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवून देण्याचे सर्वस्वी श्रेय साने गुरुजींना जाते. १९३० साली गुरुजींनी देशसेवेत उडी घेतली. तेव्हा ते गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झाले होते. विनोबाजींच्या शिकवणीचा गुरुजींवर फार मोठा प्रभाव होता. परंतु त्याच सुमारास काँग्रेसमध्ये डाव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या तरुणांची फळी तयार होत होती. त्यातूनच समाजवादी पक्ष आकारास येत होता. त्याकडे गुरुजी आकृष्ट झाले. यापुढे गुरुजींच्या राजकीय विचारांचे केंद्र ‘सर्वसामान्य श्रमिक माणूस’ हा झाला. मार्क्सवादी तत्वांचा प्रभाव गुरुजींच्या विचारांवर झाला. १९३७ नंतरच्या काळात शेतकऱ्यांचे लढे, गिरणी कामगारांचे प्रश्न, संप, मोर्चे या गोष्टींमध्ये गुरुजींचा  महत्वाचा सहभाग होता. 

स्वातंत्र्यानंतरच्या काळात झालेल्या भाषावार प्रांतरचनेचा भारताच्या एकात्मतेवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता गुरुजींना जाणवली. यातूनच ‘आंतरभारती’ ची संकल्पना साने गुरुजींनी मांडली. भारतात विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या भाषा एकमेकांशी जोडण्याची आवश्यकता गुरुजींना वाटली. विविध भाषेतील विचार, साहित्य, संस्कृती यांचे आदानप्रदान होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात गुरुजींना वैफल्याने घेरले. त्यातच महात्मा गांधी यांच्या हत्येने ते खचून गेले. या दुर्दैवी घटनेने त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. ‘अमृताचा पुत्र’ म्हणून ज्यांना विनोबाजींनी गौरवले होते ते साने गुरुजी ११ जून १९५० रोजी वयाच्या ५१ वर्षी या इहलोकातून प्रयाण करून स्वर्गवासी झाले.