साने गुरुजी : संक्षिप्त परिचय 



असेजे आपणाशी असे, 

जे वित्त वा विद्या 

सदा ते देतची जावे, 

जगाला प्रेम अर्पावे 


साने गुरुजी 

समाजवादी साने गुरुजी

साने गुरुजींचा पिंड समाजवादी विचारसरणीचा होता. गिरणी कामगार आणि शेतकरी यांच्या सुखदुःखात गुरुजी रमत असत. त्यांच्या हितासाठी सतत झटत असत. 

गिरणी कामगारांचे लढे:

खानदेशात अमळनेर, धुळे, जळगाव आणि चाळीसगाव या भागात बऱ्याच कापड गिरण्या होत्या. गिरणी मालक गिरणीतील कामगारांचे शोषण करीत असत. कामगारांना पुरेसा पगार नसे. इतकेच नव्हे तर त्यांच्या राहण्याची देखील आबाळ होत असे. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष होता. कामगारांची दुर्दशा पाहून गुरुजींचे मन हेलावले. त्यांनी सर्व कामगारांना एकत्र आणून सर्वव्यापी संप पुकारला. अमळनेर, जळगाव, धुळे आणि चाळीसगाव ही शहरे कामगारांच्या आंदोलनाने दणाणली. गुरुजींनी आपल्या सर्व शक्तीनिशी झुंज दिली. अखेर कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या. ८ एप्रिल १९३८ रोजी गुरुजींनी उभा केलेला हा लढा यशस्वी झाला. 

१९३९ मध्ये आणखी एक घटना घडली. धुळ्याच्या गिरणी कामगारांनी केलेल्या वाजवी मागण्या गिरणी मालकाने धुडकावून लावल्या. इतकेच नाही तर गिरणीला टाळेबंदी जाहीर केली. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली. गुरुजींनी यात लक्ष घातले. कामगार आणि गिरणी मालक यांच्यात वाटाघाटीचे सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु गिरणी मालकाच्या हेकेखोर वृत्तीने हे सर्व प्रयत्न असफल झाले. अखेर गुरुजींनी १३ सप्टेंबर १९३९ रोजी दुपारी बारा वाजता गिरणीचे दरवाजे उघडले नाहीत तर तापी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा केली. याने सर्व प्रांतात खळबळ माजली. अखेर गिरणी मालकाने नमते घेतले आणि गिरणीचे दरवाजे उघडले. गुरुजींनी हाही लढा यशस्वी केला. १९४० मध्ये देखील हीच परिस्थिती निर्माण झाली. गिरणी कामगारांनी केलेल्या मागण्या गिरणी मालकाने अमान्य केल्या. बोलणी फिसकटली. गुरुजींनी संप पुकारला आणि त्यातही कामगारांच्या मागण्या मंजूर करून घेतल्या. 

शेतकऱ्यांसाठी प्रयत्न:

शेतकऱ्यांसाठी देखील गुरुजींनी अनेक वेळा लढा उभारला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. १९३१ च्या सुमारास खानदेशात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आधीच दारिद्र्य आणि त्यातून ही आपत्ती शेतकऱ्यांसाठी निर्माण झाली. गुरुजींनी खेड्याकडे धाव घेतली. पिकाच्या झालेल्या नुकसानाची रीतसर नोंदणी करून कलेक्टर कडे जमा केली आणि शेतकऱ्यांना सारा माफी मिळवून दिली. 

१९३९ मध्ये देखील या घटनेची पुनरावृत्ती झाली. खानदेशात बरीच अतिवृष्टी झाली. शेतातील पिके बुडाली. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांकडून शेत सारा वसूल करू नये या मागणीसाठी गुरुजी लढले. संपूर्ण खानदेशातील शेतकऱ्यांना एकत्र करून गुरुजींनी अखेर सरकारकडून शेतसारा माफी मिळविली. याच सुमारास टोल टॅक्सचे प्रकरण उद्भवले. अमळनेरच्या म्युनिसिपालिटीने खेड्यापाड्यातून येणाऱ्या बैलगाड्यांवर टोल टॅक्स लागू केला. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना भुर्दंड पडत होता. आधीच हलाखीची परिस्थिती असलेला शेतकरी यामुळे व्यथित झाला. गुरुजींनी शेतकऱ्यांची मागणी उचलून धरली आणि कराविरुद्ध प्रचार केला. अखेर म्युन्सिपालिटीने हा कर रद्द केला.

गुरुजींचा प्रत्यक्ष राजकारणातील सहभाग १९३० पासून सुरु होतो. १९३० ते १९५० या वीस वर्ष्यांच्या त्यांच्या कार्यकाळात गुरुजींचे राजकीय विचार आकाराला आले. १९३० मध्ये गांधीजींच्या प्रेरणेने गुरुजींनी कांग्रेसमध्ये प्रवेश केला. याच सुमारास जागतिक औद्योगिक क्रांतीचा भारतीय समाजावर प्रभाव दिसू लागला. औद्योगिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या तणावातून कामगार आणि शेतकरी वर्ग निर्माण झाला. या परिस्थितीमुळे काँग्रेसमध्ये डावीकडे झुकणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार होऊन काँग्रेसमधील समाजवादी पक्ष आकाराला आला. यात गुरुजी डाव्या विचारांकडे झुकले. गुरुजींच्या राजकीय विचाराचे केंद्र सर्वसामान्य श्रमिक माणूस होता. राष्ट्रभक्ती, आर्थिक समता आणि बहुजन समाजाचे कल्याण या समाजवादी तत्वांमुळे गुरुजींनीही समाजवादी मार्ग स्वीकारला. 

गरीब-श्रीमंत, श्रमजीवी-बुद्धिजीवी, हिंदू-मुसलमान, तथाकथित उच्च व कनिष्ठ जाती या समाजातील असमानता आणि त्यातून होणारे संघर्ष नष्ट करण्याचे ध्येय गुरुजींसमोर कायम होते. परंतु हे  अमलात आणताना हिंसेचा अंगीकार त्यांना मान्य नव्हता. गुरुजी म्हणत, “अहिंसा माझ्या जीवनाचा आधार आहे. वंचितांचे हक्क जपण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु हे हक्क अहिंसेच्या मार्गाने मिळवले पाहिजेत. हिंदुस्थानांत अहिंसेशिवाय तरणोपाय नाही. हिंदुस्थान म्हणजे एक प्रचंड खंडच आहे. देश अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, अनेक भाषा, अनेक रूढी, अनंत प्रकारचा इतिहास, अनेक प्रांत, स्पृश्यास्पृश्यता, अनेक धर्म, अशा विविधतेने नटलेला आहे. या प्रचंड देशांत एकदां हिंसा सुरू झाली तर ती कोठे थांबेल याचा नेम नाहीं.

गुरुजी देशातील हिंदू आणि मुसलमान यांच्या ऐक्याचे पुरस्कर्ते होते. हिंदू-मुसलमान ऐक्याबाबत गुरुजी म्हणतात, आपण हिंदु-मुसलमानांनीं परस्पराचीं मनें ज्या ज्या गोष्टींनीं दुखावतील त्या गोष्टी वर्ज्य कराव्या. 'इस्लाम' या शब्दाचा अर्थ शांती व हिंदुधर्मातही प्रत्येक मंत्राचे शेवटीं 'शांति: शांति:' असें म्हणतात. आपले पूर्वज या मार्गानें जाऊं पहात होते. परकी सत्तेनें आपणांत पुन्हां झगडे उत्पन्न केले व आपण त्याला बळी पडलो.