अभ्यास व लेखन 

गिरीश घाटे

गिरीश घाटे - परिचय 

गिरीश घाटे हे धातुशास्त्रातील उच्च पदवीधर असून गेली पंचवीस वर्षे स्वतःचा व्यवसाय करत आहेत. घाटे ठाण्याचे रहिवासी असून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. वयाच्या साठ वर्षानंतर घाटे यांनी लेखन क्षेत्रात देखील  पदार्पण केले. 

व्यावसायिक जीवन 

गिरीश घाटे यांनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग (COEP), पुणे येथून धातुशास्त्रात BE डिग्री संपादन केली व नंतर इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स (IISc), बंगलोर येथून उच्च पदवी संपादन केली.  खाजगी क्षेत्रात काही वर्षे काम केल्यानंतर घाटे यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु  केला. घाटे यांनी डॅकोट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व  आयजेन इंजिनिर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची स्थापना केली. गेले पंचवीस वर्षे ते स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत. इन्स्टिटयूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज, नवी दिल्ली या संस्थेने २०१५ साली गिरीश घाटे यांना उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. तामिळनाडू व आसाम राज्याचे माजी राज्यपाल भीष्म नारायण सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 

सामाजिक जीवन 

गिरीश घाटे हे गेले वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. घाटे यांनी ग्रामीण शिक्षण व विकास या उद्दिष्टाने २००६ साली प्रभाकर फाउंडेशन ची स्थापना केली. घाटे सोलापूर जिल्ह्यातील यावली या गावी गेली दहा वर्षे माध्यमिक शाळा चालवत आहेत. २५० विद्यार्थ्यांना या शाळेत दहावी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील तीसहुन अधिक शाळांशी घाटे संलग्न असून अनेक सुखसोई या शाळांना घाटे यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. घाटे रोटरी संस्थेचे सक्रिय सभासद आहेत व त्यांच्या सामाजिक जीवनावर रोटरी तत्वांचा मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्र कृती समिती या संस्थेने ऑगस्ट २०१९ मध्ये घाटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्र कृति समिती ही अखिल महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटना असून महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षण विकासात कार्यरत आहे.

लेखन 

वयाच्या साठ वर्षानंतर घाटे यांनी लेखन क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीस ग्रामीण तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करणे शक्य व्हावे या हेतूने व्यावसायिक क्षेत्रात तीन पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. रोटरी युथ एक्क्सचेन्ज, निर्यात व्यवसाय आणि व्यवहार्यता अहवाल अशी ही तीन पुस्तके आहेत. त्यानंतर घाटे साहित्यिक लेखनात उतरले. घाटे यांचा 'सांग ना समजेल का?' हा पहिला मराठी कविता संग्रह फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर घाटे यांनी ‘रावसाहेब’ ही ऐतिहासिक कादंबरी जुलै २०२३ मध्ये प्रकाशित केली. याचबरोवर ‘न्या. बळवंतराव घाटे’ आणि ‘विद्यालंकार’ ही चरित्रपर पुस्तके देखील घाटे यांनी नुकतीच प्रकाशित केली आहेत. याशिवाय २०२३ मध्ये घाटे यांचे थिंक महाराष्ट्र या वेब पोर्टलवरही अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.