साने गुरुजी : संक्षिप्त परिचय 



कुणा न व्यर्थ शिणवावे, 

कुणा न व्यर्थ हिणवावे 

समस्त बंधू मानावे, 

जगाला प्रेम अर्पावे 


साने गुरुजी 

स्वातंत्र्य लढ्यात उडी 

हाती घेतलेला शिक्षकी पेशा आणि वसतिगृहाची जबाबदारी यात गुरुजींनी तन आणि मन अर्पण केले होते. परंतु त्याच काळात देशभर स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. देशकार्यात आपल्याकडून काहीच घडत नाही याची खंत गुरुजींना वारंवार होत होती. अशा अस्वस्थ मनस्थितीत गुरुजी असताना १९३० साल उजाडले.

या सुमारास गांधीजींनी ब्रिटिश व्हॉईसरॉय यांच्या समोर काही किमान मागण्या ठेवल्या. परंतु व्हॉईसरॉयने यापैकी कोणतीही मागणी मान्य करण्यास साफ नकार दिला. आता लढा अटळ होता. या मागण्यात मिठावरील कर रद्द करावा ही एक मागणी होती. ही मागणी पुढे करून गांधीजींनी ‘मिठाच्या सत्याग्रहा’ची घोषणा केली. १२ मार्च १९३० रोजी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. जशी यात्रा पुढे निघाली तशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. यात्रा २४ दिवस चालली आणि त्यात लोक ३८५ किलोमीटर पायी चालले. ६ एप्रिल १९३० रोजी यात्रा दांडी येथे पोहोचली. गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग  केला आणि गांधीजींना अटक झाली. सारा देश या घटनेने ढवळून निघाला. गुरुजींना या लढ्यात भाग घ्यावा अशी तळमळ लागून राहिली होती. परंतु वसतिगृहाच्या कामामुळे ते सत्याग्रहात भाग घेऊ शकले नाहीत. 

गुरुजींच्या मनात विचारांचे डोंब उसळत होते. देशातील दुःख आणि दारिद्र्य नाहीसे व्हावयाचे असेल तर परकीय सत्ता गेली पाहिजे. परकीय सत्तेच्या विरोधातील लढाई पराकोटीला गेलेली असताना निर्जीव पुस्तके शिकवत बसण्यात काय तथ्य आहे? इतिहास शिकवण्यापेक्षा देशाचा इतिहास घडत आहे त्यात स्वतःला झोकून देण्याची हीच खरी वेळ आहे. देशातील दुःख आणि दारिद्र्य कमी करणे काही सोपे नाही. त्या कामास आपण समर्थ आहोत असेही नाही. परंतु हे काम एकट्या दुकट्याचे नाही. अनेकांचा हातभार त्याला लागला पाहिजे. आपले जीवन एखाद्या काजव्याप्रमाणे असावे. काजव्याचा प्रकाश तो किती? परंतु तो जगाला प्रकाश देत राहतो. आपल्याजवळ देण्यासारखे काहीच नाही असे म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वतःजवळ जे असेल ते द्यावे. जे गुण आपल्याजवळ नाहीत ते आत्मसात करण्याचे प्रयत्न करत राहावे. 

अखेर गुरुजींनी निश्चय केला. शिक्षकी पेशाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ देशासाठी देण्याचे ठरवले. गुरुजींना रात्रभर झोप लागली नाही. उद्याच्या सूर्योदयाची वाट पहात गुरुजी बिछान्यात तळमळत राहिले. पहाटे उठून शुचिर्भूत होऊन गुरुजी बाहेर पडले. छात्रालयात मुले अजून साखर झोपेत होती. गुरुजींनी मुलांच्या अंगावरची पांघरुणे नीट केली. एकदा प्रेमाने त्यांच्याकडे पाहिले आणि मान वळवून ते झटकन बाहेर पडले. मुलांमध्ये गुंतलेले मन जणू मागे सोडून ते आपल्या पुढच्या कार्यासाठी बाहेर पडले. २९ एप्रिल १९३० रोजी गुरुजींनी शाळेचा निरोप घेतला. गुरुजी स्वातंत्र्य लढ्यात पूर्णवेळ सामील झाले. 

जळगाव नजीक पिंपळराळ येथे गांधीजींच्या प्रेरणेने एक आश्रम सुरू झाला होता. गुरुजी या आश्रमात दाखल झाले. चरख्यावर सूत काढणे, आश्रमाची स्वच्छता राखणे, मुलांवर संस्कार करणे इत्यादि कामात गुरुजी रुळले. गुरुजींची भाषण शैली पाहून आश्रमाने गुरुजींना आश्रमाबाहेर खेड्यापाड्यात प्रचारासाठी पाठवले. गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचे काम गुरुजींवर पडले. जन जागृती सोबत स्वातंत्र्यलढ्यासाठी लागणारा निधी गोळा करण्याचे काम देखील गुरुजींवर सोपवले गेले. पाहता पाहता संपूर्ण खानदेशात गुरुजींचे नाव एक सक्षम काँग्रेस कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध झाले. याच सुमारास १९३० मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेत असताना गुरुजी विनोबाजींच्या संपर्कात आले. पहिल्या भेटीतच त्यांची विनोबाजींवर भक्ती जडली. त्यापुढे स्वातंत्र्यलढ्यात गुरुजींनी विनोबाजींना आपले गुरु मानून त्यांनी दिलेल्या दिशेने मार्गक्रमण केले. 

१९३० मध्ये एके दिवशी सायंकाळी अमळनेर येथे गुरुजींनी एक सभा  बोलावली. सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्यादिवशी गुरुजींचे भाषण अतिशय गाजले. गुरुजींनी भाषणात स्पष्ट शब्दात साम्राज्यशाही विरोधी मतप्रदर्शन केले. विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची विनंती त्यांनी जमलेल्या समुदायाला केली. गुरुजींच्या या सभेची माहिती पोलिसांना होतीच. सभा संपताच पोलिसांनी गुरुजींना अटक केली. गुरुजींवर खटला भरण्यात आला. गुरुजींना १५ महिने सक्त मजुरी आणि दोनशे रुपये दंड अशी शिक्षा झाली. दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरुजींना झालेला हा पहिला कारावास.

१७ मे १९३० रोजी गुरुजींना धुळ्याच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तीन महिन्यानंतर गुरुजींना धुळे तुरुंगातून त्रिचनापल्ली येथील सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले. त्रिचनापल्ली च्या जेलमध्ये केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बंगाल, महाराष्ट्र अशा विविध प्रांतातील सत्याग्रही कारावास भोगत होते. या सत्याग्रहींच्या सहवासात भारतातील विविध प्रांतातील भाषा आणि संस्कृती यांचा गुरुजींना जवळून अभ्यास करता आला. याच काळात गुरुजींनी आपल्या मराठी साहित्याच्या लेखनाला सुरुवात केली. दांडी सत्याग्रहात गांधीजींना अटक झाली होती. ५ मार्च १९३१ रोजी गांधीजींना कारागृहातून मुक्त करण्यात आले आणि इतरही सत्याग्रहींची सुटका करण्यात आली. यात २३ मार्च १९३१ रोजी गुरुजींना त्रिचनापल्ली तुरुंगातून मुक्त करण्यात आले. 

गुरुजी खानदेशात परत आले आणि देशसेवेत पुनःश्च रुजू झाले. विनोबाजींच्या सांगण्यावरून गुरुजींनी डांगरीच्या आश्रमात आपला मुक्काम हलवला. गुरुजींनी खेडोपाडी जाऊन स्वदेशी मालाचे आणि खादीचे महत्त्व लोकांना पटवून सांगितले. गुरुजींनी २ ऑक्टोबर १९३१ रोजी गांधी जयंतीला अमळनेर तालुक्यातून वीस लाख वार सूत अर्पण करून सूत यज्ञाचा संकल्प पूर्ण केला. १९३१ साली गांधीजींची गोलमेज परिषद असफल झाल्यानंतर गांधीजी लंडन येथून भारतात परत आले. संपूर्ण देशात वातावरण प्रक्षुब्ध झाले होते. गांधीजींना अटक करण्यात आली. पाठोपाठ विनोबाजींनाही  जळगाव येथे अटक झाली. गुरुजींना अमळनेर येथे अटक झाली. १७ जानेवारी १९३२ रोजी गुरुजींना दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. विनोबाजी आणि गुरुजी दोघांनाही धुळे तुरुंगात पाठवण्यात आले. ऑगस्ट महिन्यात धुळे तुरुंगातील काही सत्याग्रहींना नाशिकच्या तुरुंगात पाठविण्यात आले. त्यात गुरुजींचाही समावेश होता. नाशिकच्या कारागृहातून गुरुजी १९३३ सालच्या ऑक्टोबर महिन्यात सुटले. 

नाशिकच्या कारागृहातून सुटल्यानंतर गुरुजी अमळनेर या आपल्या कर्मभूमीत परतले. खेडोपाडी जाऊन जनजागृतीचे कार्य गुरुजींनी पुन्हा सुरू केले. गांधीजींनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून गुरुजींनी १६ जानेवारी १९३४ रोजी सत्याग्रह केला. यात गुरुजींना चाळीसगाव तालुक्यात अटक झाली. गुरुजींना पुनःश्च चार महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली. गुरुजींना धुळे तुरुंगात ठेवण्यात आले. चार महिन्यानंतर जून १९३४ मध्ये गुरुजींची धुळे तुरुंगातून सुटका झाली. 

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे २७ व २८ डिसेंबर १९३६ रोजी काँग्रेसचे अधिवेशन झाले. हे अधिवेशन फार गाजले. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे ठराव व मागण्या काँग्रेसने या अधिवेशनात मांडल्या. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरू होते. गांधीजी,  राजेंद्र प्रसाद,  वल्लभभाई पटेल,  मालवीय इत्यादी नेते अधिवेशनाला  हजर होते. या अधिवेशनाच्या आयोजनात गुरुजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. संमेलनाची आखणी, प्रचार, पाहुण्यांची व्यवस्था, स्वच्छता इत्यादी मध्ये गुरुजींनी जातीने लक्ष घातले. एक सक्षम आयोजक म्हणून गुरुजींचे नाव प्रस्थापित झाले. अधिवेशनानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला खानदेशात भरघोस यश आले. यात गुरुजींचा प्रचार निर्णायक ठरला. प्रांतात काँग्रेसचे मंत्रिमंडळ आले.  गुरुजी पुनःश्च आपल्या कर्तव्यकर्मात बुडून गेले. 

६ एप्रिल १९३८ रोजी गुरुजींनी ‘काँग्रेस’ या साप्ताहिकाची स्थापना केली. तुटपुंज्या अर्थसहाय्याने गुरुजी हे साप्ताहिक नेमाने प्रकाशित करत. हे साप्ताहिक दर सोमवारी अमळनेर येथून प्रसिद्ध होत असे. गुरुजी रात्र-रात्र जागून साप्ताहिकासाठी लेखन करत. दारूबंदी, साक्षरता, अस्पृश्यता निवारण, सफाई, काँग्रेसचे संदेश, स्थानिक प्रश्न अशा अनेक विषयांवर गुरुजी लिहीत असत. कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवर देखील साप्ताहिकात गुरुजी लेखन करीत. हे साप्ताहिक गुरुजींनी दोन वर्षे चालविले. परंतु अखेर पुरेश्या निधी अभावी हे साप्ताहिक गुरुजींना बंद करावे लागले. 

१९४० साली काँग्रेसच्या सभासदांची संख्या वाढविण्याच्या मोहिमेत गुरुजींनी उत्साहाने भाग घेतला. ११ ऑगस्ट १९४० रोजी गुरुजींनी यासाठी २१ दिवसांचे उपोषण केले. या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख काँग्रेस सभासद करण्यात आले. दिनांक २३ व २४ नोव्हेंबर १९४० रोजी युवक परिषदेचे अधिवेशन पार पडले. खादी ग्रामोद्योगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुजींच्या हस्ते झाले. सेवादल संघटनेविषयी गुरुजी बोलले. त्यांचे ते भाषण अत्यंत प्रभावी झाले. परंतु त्यांचे हे भाषण सरकारला आक्षेपार्ह वाटले. गुरुजींवर खटला भरण्यात आला. गुरुजींना २ जानेवारी १९४१ रोजी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि धुळ्याच्या तुरुंगात त्यांना बंदिस्त करण्यात आले.