साने गुरुजी : संक्षिप्त परिचय 



जयांना न कोणी जगती, 

सदा ते अंतरी रडती 

तया जाऊन सुखवावे, 

जगाला प्रेम अर्पावे 

 

साने  गुरुजी 

बालपण 


साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने.  साने गुरुजी यांचा जन्म श्री. सदाशिवराव आणि यशोदाबाई या दांपत्याच्या पोटी २४ डिसेंबर १९९९ रोजी झाला. कागदोपत्री नाव पांडुरंग असले तरी घरी आणि गावात त्याला सारे ‘पंढरी’ या नावाने ओळखत. साने घराणे मूळचे देवरुखचे. सदाशिवरावांचे पूर्वज रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्यातील पालगड गावी स्थायिक झाले. साने कुटुंब हे गावचे खोत होते. गावचा शेतसारा वसूल करून तो सरकार जमा करण्याचे काम खोत करीत असत. सुरुवातीच्या काळात साने घराणे श्रीमंत घरांपैकी एक गणले जात असे. परंतु दैवाचे फासे फिरले आणि सान्यांची श्रीमंती गेली. घरात वाटणी झाली. सदाशिवराव आणि यशोदाबाईंनी नवीन बिऱ्हाड केले. चालू कमाई थांबली. सदाशिवराव  कर्जबाजारी झाले. सावकाराचे कर्ज दिवसेंदिवस वाढत गेले. मालकीची जमीन विकून कर्ज फेडण्याचा सल्ला लोकांनी सदाशिवराव यांना दिला. परंतु वडिलोपार्जित जमीन विकणे सदाशिवराव यांना योग्य वाटले नाही. सदाशिवराव आणि यशोदाबाई यांनी गरिबीतच का होईना, मुलांना मानाने वाढवण्याचा आणि त्यांना चांगले संस्कार आणि शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

पंढरीला लहानपणापासून आई-वडिलांची आदर्श शिकवणूक मिळाली. वडील सदाशिवराव यांच्या  घरची परिस्थिती गरिबीची असली तरी ते बोलण्या चालण्यात अतिशय मानी होते. कुळांशी नियमांना धरून आणि कडकपणाने वागत. व्यवहारात काटेकोर असले तरी मनाने ते अत्यंत भावनाशील होते. ‘स्वदेशी’चे ते पुरस्कर्ते होते. त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा मोठा प्रभाव होता. लोकमान्यांच्या स्वदेशी चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना सहा महिन्याचा कारावास देखील झाला. आई यशोदाबाई देखील अतिशय संस्कारी गृहिणी होत्या. पंढरीच्या मनावर आईचा फार मोठा प्रभाव होता. 

सदाशिवराव आणि यशोदाबाई दोघांनाही आपली मुले खूप शिकावी आणि संस्कारी व्हावी असे वाटायचे. यासाठी दोघांनी अथक परिश्रम घेतले. वडील पहाटे मुलांचे पाठ घेत तर आई संध्याकाळी शिकवत असे.  सदाशिवराव भल्या पहाटे उठून मुलांना श्लोक, भूपाळ्या, आरत्या, अभंग इत्यादी शिकवायचे. त्यामुळे पंढरीचे पाठांतर लहानपणापासूनच पक्के झाले. श्लोक म्हटल्याशिवाय जेवण सुरू करायचे नाही, हा घरचा शिरस्ता होता. पाठांतराबरोबरच श्लोकाचे अर्थही सदाशिवराव मुलांना समजावून सांगत.  यामुळे पंढरीचे संस्कृत देखील पक्के झाले. मुलांचे संध्याकाळचे श्लोक पाठ करून घेण्याचे काम आईचे असे. पंढरीने सर्व श्लोक  तोंडपाठ केले. याशिवाय आई पंढरीला अनेक गोष्टी सांगत असे आणि त्यातून संस्कृतीचा आणि चांगुलपणाचा बोध देत असे. या गोष्टी पंढरी मनापासून ऐकत असे आणि इतकेच नव्हे तर आपल्या मित्रांनाही या गोष्टी सांगत असे. आपल्या घरात आई-वडिलांच्या सानिध्यात पंढरी लहानाचा मोठा होत होता आणि संस्कारांची शिदोरी मिळवत होता.

पुढे जाऊन आपल्या बालमानावरील संस्काराबाबत साने गुरुजी म्हणतात, “मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या ब-यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते.  मी निर्दोष होत आहे. हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे, तो मोठा. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात.

मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला; जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो; आईजवळ रडतो; आईजवळ खातोपितो; आईजवळ खेळतो-खिदळतो, झोपी जातो, आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात, ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळतो.

मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो; त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळया फुलत असतात, हे खरे.”