साने गुरुजी : संक्षिप्त परिचय
समस्ता धीर तो द्यावा,
सुखाचा शब्द बोलावा
नाथा साह्य ते द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे
साने गुरुजी
विद्यादान
१९२४ मध्ये MA पदवी संपादन करून पंढरी अमळनेर येथील ‘खानदेश एज्युकेशन सोसायटी’मध्ये शिक्षकाच्या नोकरीवर रुजू झाला. पंढरी आता साने गुरुजी या नावाने विद्यार्थ्यांत आणि समाजात ओळखला जाऊ लागला. काळी टोपी, ओठावर ठसठशीत मिशा, गळ्याभोवती उपरणे, काळा गळाबंद कोट, पायघोळ धोतर, पायात पुणेरी जोडा आणि हातात एखादे पुस्तक असा साने गुरुजींचा वेश असे. इंग्रजी, संस्कृत, मराठी आणि इतिहास हे विषय साने गुरुजी पाचवी ते मॅट्रिक पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवत. कोणताही विषय शिकवायचा तर प्रथम त्या विषयाचा आणि त्या धड्याचा संपूर्ण अभ्यास करून मगच मुलांसमोर जायचे हा साने गुरुजींचा शिरस्ता होता. अध्यापना बरोबर संस्थेने साने गुरुजींवर वसतिगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देखील टाकली. साने गुरुजी लवकरच एक आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. तत्कालीन शिक्षण पद्धतीपेक्षा संपूर्ण वेगळे असे शिक्षण-तंत्र त्यांनी अवलंबले. ‘छडी लगे छम छम, विद्या येई घम घम’ या प्रचलित शिक्षण पद्धतीला रामराम ठोकून विद्यार्थ्यांकडून प्रेमाने आणि मायेने अभ्यास करून घेण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले. विद्यार्थ्यांना मनोरंजनाने विषयात गोडी निर्माण करावी आणि त्यांच्यातील विषयाबाबत कुतूहल जागृत करावे. एकदा कुतूहल जागृत झाले की विद्यार्थी स्वयंप्रेरणेने विद्यार्जन करतील यावर त्यांचा दृढ विश्वास होता. गुरुजींच्या शब्दात सांगायचे तर, ‘जो करी मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’
वसतिगृहाचे काम अंगावर घेतल्यावर गुरुजींचा विद्यार्थ्यांशी जवळून संबंध येऊ लागला. वसतिगृहातील मुले साने गुरुजींच्या खोलीत येऊन त्यांच्या भोवती गराडा घालत. बालमनात कसा प्रवेश करायचा आणि त्यांना कसे आपलेसे करून घ्यायचे याची उपजत जाण साने गुरुजींना होती. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गुरुजी भल्या पहाटे उठवत. विद्यार्थी एवढ्या पहाटे उठण्यास कुरकुर करत. तेव्हा गुरुजी त्यांना मायेने जवळ घेऊन अंगावरून हात फिरवून उठवत असत. प्रातर्विधी आटोपून आणि अंघोळी करून विद्यार्थी प्रार्थनेसाठी जमत. वसतिगृहाच्या मध्यवर्ती पटांगणात प्रार्थना म्हटली जाई. उठून तयार होऊन मुले शाळेला जात असत. आपले स्वतःचे अंथरूण-पांघरूण तसेच अस्ताव्यस्त सोडत. यावर गुरुजीं त्यांना कधी रागावले नाही अथवा त्यांना शिक्षा केली नाही. याउलट विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांचे अंथरूण-पांघरूण नीट घडी करून ठेवले. अस्ताव्यस्त पडलेले त्यांचे कपडे आणि पुस्तके गुरुजींनी जागेवर लावले. खोलीतील भांडी स्वच्छ धुऊन ठेवली. शाळेतून परत आल्यावर स्वच्छ झालेल्या त्या खोल्या पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले. हे सारे गुरुजींनी केले हे जेव्हा त्यांच्या ध्यानी आले तेव्हा ते वरमले. त्यानंतर विद्यार्थी रोज आपले अंथरूण, पांघरूण, कपडे, पुस्तके इत्यादी व्यवस्थित ठेवूनच शाळेत जाऊ लागले. शिक्षा करूनही जे शक्य झाले नसते ते गुरुजींनी न बोलता करून दाखवले.
वसतिगृहाच्या आजूबाजूला गुरुजींनी फुलझाडे लावली. वसतिगृहाचा परिसर सुशोभित आणि रम्य केला. मुलांना घेऊन गुरुजी बागेत बसत. सारे मिळून गाणी म्हणत. बासरी वाजवत. पाऊस पडला तर पावसात जाऊन विद्यार्थी नाचत. मुलांना फुलझाडांचा आणि निसर्गाचा सहवास मिळाला. फुले, झाडे आणि सर्व निसर्गावर प्रेम करावे. फुले जशी सुगंधी आणि विलोभनीय असतात त्याप्रमाणे आपले जीवन असावे असे गुरुजींचे विचार होते. एखादा विद्यार्थी आजारी पडला तर गुरुजी त्याची आईप्रमाणे सेवा करत. तो बरा होईपर्यंत रात्र-रात्र त्याच्या अंथरुणाशी बसून काढत. अडल्या-नाडलेल्या विद्यार्थ्याला मदत करण्यास गुरुजी सदैव तत्पर असत. एखाद्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांची फी न भरल्याने शाळा सुटत असेल तर स्वतःच्या पगारातून गुरुजी त्याची फी भरत.
गुरुजी म्हणत, शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाशी समरस होत नाही तर तो त्याला काय शिक्षण देणार? मुलांच्या घरच्या परिस्थितीचे ज्ञान किती शिक्षकांना असते? ते इतिहास शिकवितात परंतु समोरच्या जिवंत मुलांचा इतिहास त्यांना अज्ञात असतो. ते अर्थशास्त्र शिकवतात; परंतु समोरच्या मुलांची आर्थिक स्थिती त्यांना माहीत नसते. ते विद्यार्थ्यांच्या जीवनात शिरतच नाहीत. मुलांच्या जीवनात शिरल्याशिवाय काय शिकवता येणार?
याच काळात गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे छापील मासिक काढले. त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देऊन त्यांच्यात लेखन आणि वाचनाची आवड निर्माण करण्याचा गुरुजींचा हेतू होता.