साने गुरुजी : संक्षिप्त परिचय 




भरावा मोद विश्वात, 

असावे सौख्य जगतात 

सदा हे ध्येय पूजावे, 

जगाला प्रेम अर्पावे 


साने गुरुजी 

सक्रिय राजनीती 


१९४२ च्या मार्च महिन्यात ब्रिटिश सरकारने क्रिप्स योजना भारतीय जनतेला देऊ केली. परंतु गांधीजींनी ही योजना संपूर्ण फेटाळली. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अखेर गांधीजींनी ‘चले जाव’ व ‘भारत छोडो’ असे आंदोलन सुरू केले. यात गांधीजींना अटक करण्यात आली. परंतु स्वातंत्र्याचे हे लोण देशभर पसरले.

या काळात गुरुजी धुळ्याच्या जेलमध्ये कारावासाची शिक्षा भोगत होते. त्यांच्या शिक्षेची दोन वर्षाची मुदत संपून १० ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना कारावासातून मुक्त करण्यात आले. देशातील परिस्थिती पाहून गुरुजींनी भूमिगत राहून देश कार्यास वाहून घेण्याचे ठरविले. यापुढे जवळजवळ सात ते आठ महिने गुरुजी भूमिगत राहून आपले कार्य करीत राहिले. या काळातच मुंबई व पुण्यामध्ये गुरुजींचा एस.एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, शिरूभाऊ लिमये, ना. ग. गोरे इत्यादि समाजवादी मित्रांशी  संबंध आला. परंतु १८ एप्रिल १९४३ रोजी पोलिसांनी ‘मूषक महाला’वर धाड घातली. त्यात गुरुजी आणि इतर १४ भूमिगत कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. गुरुजींना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

१५ जानेवारी १९४५ रोजी गुरुजींची नाशिक कारागृहातून सुटका झाली. खानदेश मधील जनतेने आणि गुरुजींच्या चाहत्यांनी गुरुजींचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. २४ डिसेंबर १९४५ रोजी गुरुजींचा ४६ वा वाढदिवस जळगाव येथे साजरा केला गेला. त्यांचा सत्कार करून त्यांना १५,००० रुपयांची थैली देण्यात आली. त्या दिवशी जळगाव शहरातून गुरुजींची ४६ बैलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. खेड्यातील हजारो शेतकरी व कामकरी या समारंभासाठी आले होते. धुळ्यातही गुरुजींचा सत्कार करण्यात आला. जमा झालेला निधी गुरुजींनी खानदेशातील कार्यकर्त्यांच्या निर्वाहाकरिता दान केला. 

भारतीय संस्कृतीत रूढ झालेला जातीयवाद गुरुजींना अमान्य होता. गुरुजी त्यांच्या शालेय जीवनातील एक आठवण सांगतात. गुरुजी वाडी येथील गुरुद्वादशीच्या एका मोठ्या उत्सवाला गेले होते. उत्सवात ब्राह्मणांना साग्रसंगीत भोजन दिले जात होते. इतरांना मात्र जेवण नव्हते. जेवायला बसलेल्या ब्राह्मणां भोवती प्रदक्षिणा घालण्याचे त्यांचे काम! याने त्यांना पुण्य लाभते ही त्यांची अंधश्रद्धा. ब्राह्मणांचे जेवण झाल्यावर सारे उरलेल्या अन्नावर ‘प्रसाद’ म्हणून तुटून पडले. या साऱ्या प्रकाराने गुरुजींच्या बालमनावर धर्मातील अंध चालीरीती बाबत घृणा  उत्पन्न झाली. 

गुरुजी म्हणतात, “धर्माच्या नावाखाली माणसांचे आम्ही पशू कसे केले आहेत, ते यावरून दिसून येईल. भोजनभाऊ देवस्थांची उत्पन्न खालसा केली पाहिजेत. राष्ट्रातील जनतेला ज्ञानाची भाकरी घ्यायला पैसा नाही, मग हे सत्यनारायण कसले पुजता? सा-या गाद्या, सारी पीठे कायद्याने बंद करण्यात आली पाहिजेत. धर्म म्हणजे माणुसकी. मानवाची मान उंच करणे म्हणजे धर्म. तरुणांनी ह्या मानवाचे उपासक व्हावे. कोणाची मान ताठरलेली नको. कोणाची वाकलेली नको. जगात दीनवाणेपणा नको. जगात मगरूरपणा नको. जगात सरळपणा हवा आहे. तुझा धर्म काय? विचारताच ‘माणूसकी’ सांगावे. हिंदू धर्म, मुसलमान धर्म ही नावे विसरून ‘माणुसकी’ धर्म रूढ केला पाहिजे.”

हरिजनांच्या समान हक्कासाठी गुरुजी कायम झटले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश नव्हता. तो मिळावा यासाठी गुरुजींनी १९४६ मध्ये संघर्षाला सुरुवात केली. गुरुजी आणि सेनापती बापट यांनी हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी राज्यभर दौरा केला. प्रवेशाला अनुकूल असलेल्या थोरामोठ्यांचे एक ‘हरिजन मंदिर प्रवेश मंडळ’ स्थापन करण्यात आले. 

गुरुजी १ मे १९४७ रोजी पंढरपुरी पोहोचले. गुरुजींनी आमरण उपोषण घोषित केले. गुरुजींनी दिलेल्या निवेदनात गुरुजी म्हणतात, “पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरास येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करत राहीन.” गुरुजींच्या या अग्निदिव्याने सारा महाराष्ट्र  व्यथित झाला. अनेक ठिकाणाहून लोक व नेते पंढरपूरला येऊन पोहोचले. अखेर १० मे १९४७ रोजी गुरुजींचे उपोषण आणि निर्माण झालेल्या समाजाच्या दबावापुढे मंदिराच्या संचालकांनी नमते घेतले आणि हरिजनांना मंदिर प्रवेश मुक्त झाला. 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. याचा गुरुजींच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांना नैराश्याने घेरले. १ फेब्रुवारी १९४८ रोजी, झाल्या प्रकाराचे प्रायश्चित्त म्हणून गुरुजींनी २१ दिवसांचे उपोषण आरंभले आणि ११  फेब्रुवारीला उपोषण सोडले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिकाची सुरुवात केली. हे साप्ताहिक लवकरच मराठी जनतेत लोकप्रिय झाले. 

गुरुजी जेव्हा त्रिचनापल्ली येथील कारागृहात होते तेव्हा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बंगाल, गुजरात अशा अनेक राज्यातील सत्याग्रहींशी त्यांची ओळख झाली होती. देशाच्या एकात्मतेसाठी प्रत्येक राज्यातील जनतेला इतर राज्यातील भाषा आणि संस्कृती माहित असणे आवश्यक आहे हे गुरुजींना जाणवले. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी त्यातून प्रकट होणारे भाव एकच आहेत हे त्यांना दिसून आले. वेगवेगळ्या भाषिकांमध्ये आपण वेगळे आहोत असे भासत असले तरी भारताचा आत्मा एक आहे. जर ह्या वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास झाला, चालीरीतींचा परिचय झाला, तर या विविधतेतील ऐक्याचा प्रत्यय लोकांना येईल आणि भारताचे हृदय कसे एक आहे हे समजेल. यासाठी ‘आंतरभारती’ ही संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मानस होता. अशा संस्थेत भाषा आणि साहित्य या बरोबर चित्रकला, नृत्यकला यांचाही अभ्यास केला जावा ही त्यांची संकल्पना होती.

परंतु देवाला वेगळेच मंजूर होते. ११ जून १९५० रोजी गुरुजी पहाटे चार वाजता इहलोक सोडून देवाघरी गेले. गुरुजींचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन स्वतःचा अंत केला होता. गांधीजींच्या हत्येनंतर गुरुजींना उदासीनतेने घेरले होते. गुरुजींच्या मनी स्वतः बाबत हीनतेची भावना प्रथमपासूनच होती. ‘धडपडणारा श्याम’ या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी तसे व्यक्त देखील केले होते. गुरुजी म्हणतात,

”माझं स्थान मला कुठेच दिसत नाही. मला वर्णच नाही. नवीन तेजस्वी सर्वोदयकर विचार देणारा मी ब्राह्मण नाही. अन्यायाविरुध्द तडफेने उठून, बंडाचा झेंडा उभारुन, मरण-मरण करणारा मी क्षत्रिय नाही. देशातील उद्योगधंदे कसे वाढतील, कृषी उद्योग कसे सुधारतील, ग्रामोद्योग कसे लागतील, मधुसंवर्धन विद्या, कागदाचा धंदा वगैरे कसे पुनरुज्जीवित होतील, ह्यासंबंधी मला काहीही येत नाही. मी केवळ मजुरी करणारा शूद्रही नाही. कारण मजुरीची सवय नसल्यामुळे, तासनतास मी शरीरश्रम करु शकत नाही.

”मग माझा उपयोग काय? रात्रंदिवस हा प्रश्न मला टोचीत आहे. मला खाणं विषासम वाटतं! जगणं असहय होतं! मी का खावं प्यावं? मला अधिकार काय? ज्याला प्रामाणिकपणे वाटेल, की आपण केवळ भूभार आहोत, त्याने खुशाल आत्महत्या करावी. मी केवळ तुमच्या आसक्तीमुळे जगत आहे. माझी निरर्थकता तुम्हांला समजून, तुम्ही मला आनंदाने ह्या जगातून निघून जायला जर संमती द्याल, तर किती छान होईल?"