साने गुरुजी : संक्षिप्त परिचय 



जगी जे हिन अतिपतित, 

जगी जे दिन पददलित 

तया जाऊन उठवावे, 

जगाला प्रेम अर्पावे


साने गुरुजी 

शिक्षण 

पालगड गाव खूप लहान होते. तिथे शिक्षणाची पुरेशी सोय नव्हती. पुढील शिक्षणासाठी आई-वडिलांनी पंढरीला मामाकडे मुंबईला पाठवले. परंतु तेथे पंढरीचे मन रमले नाही. अखेर सदाशिवरावांनी शिक्षणासाठी पंढरीला त्यांच्या बहिणीकडे; दापोली येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. पालगड ते दापोली हे तसे जास्त अंतर नव्हते. परंतु पंढरीला आपले घर आणि आई-वडील यांना सोडून दापोलीला राहण्यासाठी जावे लागले. पंढरीचे  आईवर अतोनात प्रेम होते. मातृवियोग पंढरीला अतिशय दुःखदायक होता. पंढरीच्या शब्दात,

दूर शिकण्याते श्याम निघे जाया
रडे माता तिज आवरे न माया ।
पुशी लोचन ती धरुनी मनी धीर
धैर्य लोपे येऊन पुन्हा नीर ॥

पित्या वंदी साष्टांग श्याम भावे
पिता आशीर्वच देत मूक भावे ।
गाडिमध्ये सामान सर्व गेले
वियोगाचे पळ शेवटील आले ॥ 

मायबापांचा विरह तो नसावा
बहिणभावांचा विरह तो नसावा ।
परी विद्येचा भक्त बघे होऊ
त्यास कुठले ते मायबाप भाऊ ॥ 

पंढरी आपल्या आत्याच्या घरी दापोली येथे राहण्यास गेला. १० जून १९१२ रोजी पंढरीने दापोलीच्या ‘मिशन हायस्कूल’ मध्ये प्रवेश घेतला. पंढरीला दापोलीची शाळा खूप आवडली. मिशन हायस्कूल त्याकाळी काही नामांकित शाळांमध्ये गणले जात असे. महर्षी कर्वे, रँगलर परांजपे, काणे यांच्यासारखे विद्यार्थी या शाळेने घडवले. पंढरीचे पाचवी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. 

दापोली येथील आत्याच्या घरातील वातावरणात पंढरी पुष्कळ काही शिकला. ‘लवकर निजणे आणि लवकर उठणे’ हा नियम पंढरी  येथेच शिकला. व्यवस्थितपणाची सवय पंढरीला येथेच लागली. कामाचा कंटाळा गेला. या सवयी पंढरीला आयुष्यभर कामी आल्या.  खूप शिकून आयुष्यात  बरेच काही करण्याची इच्छा पंढरीच्या मनात येथेच रुजली. शाळेतल्या अभ्यासाबरोबरच पंढरीने शाकुंतलची प्रस्तावना, काव्य दोहन, नवनीत, वृत्तदर्पण  अशी अनेक पुस्तके वाचून काढली.  लोकमान्य टिळकांचा केसरी पंढरी नियमित वाचत असे. पंढरीच्या बुद्धीला याच काळात तेज आले.  शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये पंढरी हमखास बक्षीस मिळवी. तो कविताही लिहू लागला. पंढरी  दापोलीच्या शाळेत पाचवी वर्ग पास झाला. पंढरीला खूप आनंद झाला. दापोलीमध्ये आत्याकडे राहून शिक्षण घेत असतांनादेखील पंढरीचे आईवरचे प्रेम खचितही कमी झाले नाही. दर शनिवार-रविवार पंढरी आईला भेटायला दापोली ते पालगड हे १० किलोमीटरचे अंतर पायी चालत जात असे. परंतु दरम्यान सदाशिवरावांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती. धनहीन परिस्थितीत संसाराचा गाडा ओढणे सदाशिवरावांना अवघड जात होते. अशा परिस्थितीत पंढरीचे पुढील शिक्षण चालू ठेवणे सदाशिवरावांना अशक्य झाले. नाईलाजाने सदाशिवरावांनी पंढरीचे शाळेतून नाव कमी केले. 

परंतु पंढरीला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती. वडिलांवर आर्थिक बोजा न पाडता पुढील शिक्षण घेण्याचा पंढरीने निर्णय घेतला.  त्या कोमल वयात असा धाडसी निर्णय क्वचितच कोणी घेईल.  पंढरीने चौकशी करून माहिती काढली की औंध संस्थानात शिक्षणाची चांगली सोय आहे. गरीब विद्यार्थ्यांना तेथे मोफत राहणे आणि जेवण मिळते. पंढरीने औंध संस्थानात जाण्याचा निर्णय घेतला. पंढरीने औंध  येथील ‘श्री यमाई श्रीनिवास विद्यालयात’ प्रवेश घेतला. दुर्दैवाने पंढरीला वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. पंढरीने एक लहानशी खोली भाड्याने घेतली. जेवणासाठी माधुकरी मागितली. स्वतः स्वयंपाक करून उदरनिर्वाह केला. परंतु पंढरीच्या पदरात निराशा आली. औंधला प्लेग सुरू झाला. औंधची शाळा बंद पडली.  पंढरीला पालगडला परत यावे लागले. पंढरीने प्रयत्न सोडला नाही. पुढील शिक्षणासाठी त्याने पुण्याला जाण्याचे ठरविले. अखेर पंढरी पुण्यात येऊन पोहोचला. पुण्यातील ‘नूतन मराठी विद्यालयात’ सहावीच्या वर्गात पंढरीने प्रवेश घेतला. तेथेच त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कष्ट करून, अर्धपोटी राहून पंढरी पुण्यातून १९१८ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाला. दुर्दैवाने याच सुमारास पंढरीची आई देवाघरी गेली.  पंढरीला याचा फार मोठा धक्का बसला. 

औंधची शाळा सुटली तेंव्हा पंढरी घरी गेला होता. पंढरीची त्यावेळी आईशी झालेली भेट अखेरची ठरली. ‘परत येत आहे’ म्हणून पंढरीने पत्र पाठवले होते.  सकाळच्या वेळी पंढरी घरी पोहोचला तेंव्हा आई स्वयंपाकात होती. पंढरीने बाहेरूनच “आई” अशी हाक मारली. हातातले काम टाकून आई तशीच बाहेर आली. “आलास सुखरूप? तुझ्या वाटेकडे सारखे डोळे होते”. आई सद्गदित होऊन म्हणाली. पंढरी आईला बिलगला. आई बराचवेळ पंढरीच्या पाठीवरून हात फिरवीत होती. आईने आणि पंढरीने सुख दुःखाच्या मनसोक्त गप्पा मारल्या. मुलगा बऱ्याच दिवसांनंतर घरी आला म्हणून आईने गोडधोड करून खाऊ घातले. काही दिवसांनी पंढरी पुण्याला गेला. आईची ही आपली अखेरची भेट असेल हे त्याच्या स्वप्नीही नव्हते. 

आईच्या वियोगावर पंढरी लिहितो, माझ्या जीवनातली आशा गेली, प्रकाश गेला. माझ्या जीवनाचे सूत्र तुटले. माझ्या जीवन नौकेचे सुकाणू नाहीसे झाले, माझे सारे मनोरथ धुळीत मिळाले. माझ्या आईला मी सुखवीन हे माझे ध्येय मला मिळाले नाही. ती अतृप्त आशा मला सारखी दु:खी करीत असते. माझ्या जीवनात एक प्रकारचा कायमचा अंधार त्या वेळेपासून आला. एक प्रकारची अगतिकता, निराधारता त्या वेळेपासून माझ्या जीवनात शिरली आहे.”

“माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्यात जे चांगले आहे, जे पवित्र आहे, ते सारे तिचे आहे. माझी आई गेली; परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच, या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल, असे तिला वाटले असेल. स्वातंत्र्ययुध्दात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणून आईने स्वत:ला दूर केले असेल. तिचे प्रेम, कृतज्ञता, कर्तव्यबुध्दी, सोशिकता, मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्प शक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता माझे  सोने होवो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही होवो.”

मॅट्रिक पास झाल्यावर पंढरीला एखादी नोकरी मिळू शकली असती.  परंतु पुढील शिक्षणाची तहान पंढरीला होती. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पंढरीने पुण्यातील ‘न्यू पूना कॉलेज’ मध्ये प्रवेश घेतला. हे  कॉलेज आता एस. पी.  कॉलेज म्हणून ओळखले जाते. १९१८ ते १९२२ या काळात पंढरीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मराठी आणि संस्कृत विषयात BA पदवी संपादन केली. पुण्यात शिक्षण घेत असतांना प्रो. घारपुरे, दत्तो वामन पोतदार, प्रो. द. के. केळकर, प्रो. ना. सी. फडके, श्री. रा. कृ. लागू, इत्यादी प्रसिद्ध वक्ते, लेखक, संशोधक आणि विद्वानांच्या सहवासाचा व त्यांच्या शिकवणीचा लाभ  पंढरीला या काळात मिळाला. पंढरीला मराठी साहित्यात लेखनाची तोंडओळख याच सुमारास झाली. BA पदवी मिळवल्यानंतर पंढरीने अमळनेर येथील तत्वज्ञान मंदिरात प्रवेश घेतला. पंढरीला तत्त्वज्ञान विषयात खूप रस होता. परंतु तत्वज्ञान मंदिरातील वातावरणात पंढरी रमला नाही. १९२४ मध्ये त्याने तत्वज्ञान विषयामध्ये MA पदवी संपादन केली आणि मंदिराला रामराम ठोकला. 

त्याच सुमारास पालगड येथे पंढरीचे वडील निवर्तले. पंढरीची घरची जबाबदारी वाढली. लहान भावंडांच्या शिक्षणासाठी अर्थार्जन आवश्यक होते. अमळनेर येथील ‘खानदेश एजुकेशन सोसायटी’च्या शाळेत शिक्षकाची जागा रिकामी होती. पंढरीने शिक्षक म्हणून या संस्थेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.